दादर रेल्वे स्थानक परिसर
मुंबईचे हृदय समजले तरी त्यात काही अतिशयोक्ती नाही. कारण या मुख्य ठिकाणापासून सर्वच सुविधा हाकेच्या अंतरावर. मोठमोठे मॉल्स, कॉर्पोरेट ऑफिस पासून ते अगदी रस्त्यावर व्यवसाय करणारी , मोल मजुरी करुन आपले पोट भरणारी सर्व साधारण माणसे.
असाच एके दिवशी कामानिमित्त दादरला उतरलो. दादरच्या फुल मार्केट, भाजी मार्केटला फेरफटका मारत असताना एका ठिकाणी सहज थांबलो.
एक आजीबाई, हो आजीबाईच अगदी साठ – सत्तरीची असेल. तरीही चपळ हालचाल, कामाची तडफ दिसत होती. बरीचशी गिऱ्हाईक येत होती आणि आजीकडून ताजी भाजी घेऊन जात होती. काही जणांनी आजीला कोणती भाजी हवी आहे हे खास करुन सांगून ठेवलेले दिसत होते. मी बाजूलाच उभा राहून निरीक्षण करत होतो.
आजीबाईंकडे जशी चांगल्या मध्यम वर्गातील माणसे येत होती, तशी साधारण परिस्थितीतील लोकांची सुद्धा वर्दळ होती. मात्र आजी सर्वांशी प्रेमाने , मायेने वागत होत्या. आजीला नफा नको हवा होता तर जी काही चीज वस्तू आणलेली आहे ती कुणाच्या तरी मुखी लागावी हाच उद्देश असावा असे आजीच्या एकंदर स्वभावावरुन दिसत होते. दोन तीनदा असेही झाले काही गिऱ्हाईकांकडे पुरेसे पैसे असल्याचे दिसत नव्हते, मात्र आजीने कोणतीही कुरकुर न करता अगदी त्यांनी जे दिले ते आनंदाने स्वीकारले.
थोडीशी गर्दी ओसरल्यावर मी आजी जवळ गेलो आणि सहज चौकशी केली त्यावेळी कळले त्या आसनगाव वरुन ये जा करत होत्या. भल्या पहाटे उठून हा त्यांचा नित्यक्रम चालू होता. आयुष्याच्या निवृत्तीच्या काळात हे काम त्या आवडीने करत होत्या. गेली ४० वर्ष अव्याहतपणे त्यांचे हे काम चालू होते. ” बाबू, बसून काय करणार, माझ्या या कामामुळेच मी आजपर्यंत ठीक ठाक हाय!” हे त्यांचे उत्तर ऐकून ठीक ठिकाणी उभ्या राहिलेल्या निर्जीव फिटनेस सेंटरची मला कीव वाटली. कुठे हे आयुष्यातील मेहनतीचे धडे गिरवत तब्येत राखणारे चालते बोलते फिटनेस सेंटर आणि कुठे ते मनातून निवृत्ती घेऊन फिटनेस सेंटरचा कुत्रिम मंत्र जपणारी मंडळी.!
आजींकडची मी ही भाजी घेतली आणि आजीचा निरोप घेत निघालो. हा साधारणसा प्रसंग सांगण्याचे कारण इतकेच. ही जी सर्वसाधारण किरकोळ विक्री करणारी मंडळी असतात ती जगण्यासाठी आपली लढाई लढत असतात. जगण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु असतो. त्यांना नफा नको असतो, पण जगण्यासाठीच्या – पोटापाण्याच्या लढाईत आपली साथ हवी असते. आपण सोफिस्टीकेड मॉल मधून भाजी फळे खरेदी करण्यापेक्षा या गरीब माणसांकडून खरेदी केलीत तर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान तुम्हाला खूप काही सांगून जाईल..