शिकवणी

नवी मुंबईतून ते सी.एस.एम.टी. हा माझा नेहमीचा प्रवास , हार्बर रेल्वेने ! नवी मुंबईतून या मार्गाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी ०७.३० नंतर सर्वच ट्रेन्स गर्दीने जवळ जवळ ओसंडून वाहत असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अत्यंत नियोजनपूर्वक वसवलेले शहर. मुबलक बाग बगीचे आणि मुलांना खेळण्यासाठी मैदाने , खरेदीसाठी मोठ मोठे शॉपिंग मॉल्स त्यामुळे अनेकांचा या नगरीकडे ओढा वाढत आहे.

    तर असे हे आधुनिक शहर असले तरी रोजी रोटीसाठी जुन्या मुंबईकडेच जास्त ओघ असतो. मग ती हार्बर रेल्वे असो कि मध्य रेल्वे कि पश्चिम रेल्वे, सर्वच जण सरकारी अथवा खासगी कार्यालयाच्या निमित्ताने त्या दिशेला प्रवास करीत असतात .

    हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे अशा नेहमीच्या प्रवासात नेहमी गमती जमती घडत असतात. काही चांगल्या असतात, काही वाईट तर काही बोध देणाऱ्या असतात. बरेचशे मोबाइल मध्ये गुंग त्यातील काहीजण गप्पांचा फड रंगवतात तर काही कोणत्यातरी मानसिक तणावाखाली प्रवास करत असलेले दिसतात.

   माझा नेहमीचा नवी मुंबई ते सी.एस.एम.टी. प्रवास . कुर्ला स्थानक गेल्यानंतर डब्यात बसायला जागा मिळते . त्यानंतर एक एक करत प्रवासी आपल्या स्थानकांवर उतरत जातात. मस्जिद बंदर स्थानक गेल्यानंतर मात्र उर्वरित प्रवासी आपले सामान सुमान काढायला घेतात. उतरण्यासाठी सज्ज होतात.  अशाच एके दिवशी सी.एस.एम.टी. स्थानकात ट्रेनने प्रवेश केल्यावर एक आवाज आला ‘ प्लीज पंखे बंद करा ‘ . अंतिम स्थानक आल्यांनतर घाई गर्दीत उतरुन जाण्यासाठी हा आवाज हि विंनती जगावेगळी होती. काहींनी आवाज दिला म्हणून जबरदस्तीने पंख्यांची बटने बंद केली. काही जण त्या महाशयांकडे दुर्लक्ष करत उतरुन गेले. पण त्या गृहस्थांनी मग स्वतः येऊन त्या त्या बाजूची बटने बंद केली आणि सर्वात शेवटी निघाले.

   दुसऱ्या  दिवशीही सी.एस.एम.टी. स्थानकात ट्रेनने प्रवेश केल्यावर कालच्या काकांचा पुन्हा एकदा विनंतीच्या स्वरुपात आवाज आला , ‘ प्लीज पंखे बंद करा ‘ . प्रवाशांमध्ये कुजबुज सुरु झाली . ‘अरे ह्यांना काय प्रॉब्लेमआहे ‘, काही गमतीने म्हणाले ‘ ट्रेन वस्तीला आलीय का ? , एस.टी. बस सारखी ‘.! काही हिंदीतील खुसर फुसर ‘ अरे यार ये भाई का क्या चल रहा है , कल भी दिमाख खा रहा था l  अशा  सर्व गोष्टींकडे काना डोळा करत त्या काकांनी पुन्हा एकदा स्वतः जाऊन पंख्यांची बटने बंद केली आणि नंतरच उतरले.

    त्यांनतर पुढील दोन – तीन दिवस त्यांचा नित्यक्रम चालू होता, ते आपले काम शांतपणे करत होते. होणारी कुजबुज हि थांबली होती. त्यातील काहीजण बळ जबरीने का होईना आपला हात पंख्यांच्या बटनाकडे न्यायला लागले !

   एका दिवशी सी.एस.टी. स्थानकात काका उतरल्या नंतर  त्यांना जाऊन गाठले. काका ६० – ६५ कडे झुकलेले ,मात्र त्यांची  तडफ  चाळीशीतली . काकांना जास्त आड वळणाने न बोलता सरळ विचारले कि काका सी.एस.टी. ला थांबणारी ट्रेन ४/५ मिनिटांसाठी थांबत असेल , मग तुमचा एवढा अट्टाहास का ? कि सर्व पंख्यांची बटने बंद झाली पाहिजेत ? माझ्या प्रश्नांचे भडीमार ऐकल्यावर स्थानकातून बाहेर पडण्या अगोदर एका कोपऱ्यात थांबले आणि सांगू लागले , ‘ बेटा , आपण प्रवास करतोय ती राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याचा विनियोग नीट होणे गरजेचे आहे. आमची हयात गेली आता , पण येणाऱ्या पिढीला उर्जेचे महत्व पटावे म्हणून मी हे करत असतो. वेगवेगळे डब्बे आणि ट्रेनच्या अर्धा एक तासांच्या वेळांचा संगम साधत मी हे काम करीत आहे. उद्देश एकच आहे कि नवीन पिढीला याची जाणीव व्हावी आणि ते सुद्धा या कार्यात सामील व्हावे.‘  मला उशीर होतोय असे सांगून बोलता बोलता काका निघालेसुद्धा..!

   दुसऱ्या दिवशी सी.एस.एम.टी. स्थानक आले. काका आवाज देणार इतक्यात मीच आवाज दिला ‘ काका , इकडचे पंखे मी बंद करतोय, नका येऊ इकडे !’ हे ऐकून इतर ठिकाणी बसलेल्या  प्रवाशांनी  आपापल्या जवळची पंख्यांची बटने बंद करायला घेतली. अगदी दोनच दिवसात सर्वच प्रवाशी आठवणीने पंखे करायला लागले. दोन तीन मिनिटांसाठी का होईना उर्जा बचतीचे महत्व सर्वांना पटायला लागले.

   पुढील काहीदिवस नियमित दिसणारे काका नंतर मात्र दिसेनासे झाले. मी मनोमन समजून गेलो काकांनी आपली शिकवणी दुसऱ्या डब्यात चालू केली दिसतेय !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top