जगण्यातील सौंदर्य

नवी मुंबईतील हार्बर रेल्वे स्थानकातील एक स्थानक. या ठिकाणची बहुतेक रेल्वे स्टेशन्स खाली प्रशस्त सबवे असलेली आहेत. काही स्थानकांवर नेहमी वर्दळ असते तर काही सकाळ संध्याकाळीच गजबजलेली असतात. अशाच एका स्टेशन परिसरातली हि घटना.

  एके दिवशी सकाळी घाई घाईत ऑफिसला जात असतांना सबवेत हात पसरुन मदतीची याचना करत उभ्या असलेल्या स्त्री – पुरुषाकडे लक्ष गेले.  सत्तरीकडे झुकलेल्या आजोबांना कमरेला लागलेला पट्टा, त्यांना आधार देत उभी असलेली मध्यम वयाची बाई, असे ते दृश्य होते. काही प्रवाशी ते केविलवाणे दृश्य बघून हातात लागतील ते पैसे ठेवून निघून जात होते. मला हि गेल्या आठवड्यात ट्रेनमध्ये  कोणाचे तरी ५० रुपये पडलेले मिळाले होते. शेवटच्या  स्थानकात उतरता सर्वांना कोणाचे पैसे आहेत असा आवाज दिला पण कोणीही पुढे न आल्याने ते जपून ठेवलेले कि कोणा गरजवंताला द्यावे म्हणून. लगेचच मनात विचार आला आजोबांना कदाचित उपचारासाठी मदत हवी असेल म्हणून पाकिटात जपून ठेवलली  ५० रुपयाची नोट त्यांच्या समोर ठेवली. उशीर झाला म्हणून ट्रेन पकडण्यासाठी धावतच जिन्याकडे वळलो.   

    काही दिवस गेले, मी तो प्रसंग विसरुन गेलो होतो. परंतु एका संध्याकाळी घरी परतत असतांना स्टेशनच्या शौचालया लगतच त्यादिवशीचे आजोबा पथारी टाकून बसलेले दिसले. कमरेला पट्टा मात्र नव्हता. त्यांना दिलेली ५० ची नोट माझी नव्हती , परंतु त्याचा योग्य विनियोग झाला कि नाही याचे मात्र कुतूहल मला शांत बसू देत नव्हते. शेवटी न राहवून मी आजोबांना आवाज दिला , “ काय आजोबा , कसे आहात , आज कमरेला पट्टा नाही लावलात ?”  आजोबा थोडेसे प्रश्नार्थक आणि गोंधळून गेलेले दिसले . मग मीच त्यांना म्हणालो कि काही दिवसांपूर्वी तुम्ही त्या सबवेत उभे होतात पट्टा लावून, तुमच्या सोबत एक बाई होती त्यासुद्धा तुम्हाला आधार देत उभ्या होत्या. हे ऐकून आजोबा काही वेळ शांत राहिले. मी हि अवघडल्या स्थितीत उभा होतो . बोलू कि नको बोलू  अशा द्विधा मनस्थितीत ते होते. मात्र थोड्या वेळाने त्यांनी बोलायला सुरुवात केली.  

   “ माझ्या  आयुष्यात आता सख्खे असे कोणीच उरले नाही. पत्नी होती ती काही वर्षापूर्वी साध्या आजाराचं निमित्त होऊन देवाघरी गेली. या परिसरात पोटापुरते मागून खातो . झोपण्यापुरता आसरा कुठेही मिळतो नाहीतर आपले स्टेशन असतेच ! ‘   आजोबा आता बोलायला लागले होते मी हि आजूबाजूला येणाऱ्या जाणाऱ्यांची तमा न बाळगता त्यांच्या बाजूलाच रुमाल अंथरुन बसलो.  आजोबांनी पुंन्हा सांगायला सुरुवात केली.

   “ समोर ए टी एम दिसतेय ना एकेदिवशी त्याच्या बाहेर मी बसलेलो असतांना एक बाई आसवे पुसत बाहेर आली आणि हुंदके देत रडायला लागली , मी वडिलकीच्या नात्याने विचारले पण बहुतेक या रस्त्यावरच्या  फाटक्या माणसाला काय सांगायचे अशा विचाराने ती तशीच उभी राहिली. “ आजोबा सांगत असतांना त्यांची भाषा आणि वागणे मला सुसंस्कृत वाटत होते त्यांची पार्श्वभूमी कदाचित चांगल्या घरातील  होती असे मला राहून राहून वाटत होते. पण त्यांचे सांगणे मध्येच तोडावे असे मला वाटले नाही.

    आजोबा म्हणाले, खूप वेळ शांततेत गेला, मग पुन्हा एकदा थोड्याशा मायेने विचारले असता तिने सांगायला सुरुवात केली  कि दोन महिन्यापूर्वी तिचे घरकाम सुटले. पोटा पाण्याचा प्रश्न होता त्याही पेक्षा मुलीच्या शिक्षणासाठी तिला पैशांची गरज होती. मग मीच तिला सांगितले “ बाय, माझ्या कमरेचे हाड दुखतेच आहे, बऱ्याच वेळा मी एका प्रवाशाने दिलेला पट्टा लावतो, उद्या सकाळी तुझ्या मुलीच्या मदतीसाठी मी उभा राहीन , आधार म्हणून तुम्हीही बाजूला थांबा .“

      साहेब, तुम्हाला सांगायचे म्हणजे जी लोक इतर दिवशी सुट्टे पैसे द्यायची त्यांनी त्या दिवशी त्यांनी     १० , २० , ५० च्या नोटा दिल्या . मला आधार देत खाली मान घालत उभी असलेली त्या मुलीच्या आईने एवढा त्रास न करण्याची वारंवार विनंती केली. पण मी मात्र दोन एक तास उभा राहिलो असेन. ११ , ११.३०  वाजताच्या सुमारास  पाठीच दुखणे असह्य झालं म्हणून नाईलाजास्तव कोपऱ्यात विसावलो. मात्र लोकांनी सढळ हस्ते मदत केली होती , एकूण पैसे मोजले तेव्हा १२३१/ रुपये जमल्याचे बाईने सांगितले. सर्व पैसे मुलीच्या शिक्षणासाठी तिच्याकडे दिले. माझीही नात असती तर मी तिच्यासाठी हे केले असते असे सांगून त्या बाईची पाठवणी केली. त्यानंतर काही दिवस मी हि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोटापुरते मागत होतो, आज बऱ्याच दिवसांनी इथे पुन्हा येऊन टेकलो तर तुम्ही चौकशी केलीत , चला साहेब थोडा पडतो आता जास्त वेळ एका स्थितीत मला राहता येत नाही .

    मी सुन्न होऊन हे सारे ऐकत होतो, थोडी मदत केल्यावर बोलून दाखवणारी आपल्या सारखी माणसे, मदतीचा बडेजाव करुन  मिरवणारी माणसे आणि कुठे तो शौचालयाच्या  बाजूला गोणपाट टाकून पहुडलेला श्रीमंत मनाचा माणूस !

आजोबांना मनापासून नमस्कार करुन मी माझ्या विचार चक्रातच कधी घरी पोचलो ते कळळेच नाही..   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top